अकोले तालुक्यात वाळूची तस्करी वाढली ; पोलिसांची कारवाई, महसूल मात्र सुस्त | पुढारी

अकोले तालुक्यात वाळूची तस्करी वाढली ; पोलिसांची कारवाई, महसूल मात्र सुस्त

अकोले, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात वाळू तस्करांनी खुलेआम वाळू उपसा सुरू केला आहे. महसूल प्रशासनाच्या कारवाई अभावी सध्या वाळू तस्कर मोकाट आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग कानाडोळा करत असला तरी २ लाख रुपये किमतीचा एक लाल रंगाचा स्वराज कंपनीचा एम एच १४ डि एच ०५४८ हा ट्रॅक्टर बेकायदेशीरपणे वाळु चोरी करताना अकोले पोलिसांनी पकडला. या प्रकरणी चंद्रकांत मारुती बांबळे (वय ३७ रा घोटकरवाडी, सातेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पाच हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू व २ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर असा एकूण २ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तालुक्यातील प्रवरा, मुळा या नद्या वाळू तस्करांसाठी सोन्याची खाण मानली जातात. निळवंडे, अकोले, कोतुळ, कळस, निब्रळ, पाडाळणे, धामणगाव पाट, विठा तसेच अन्य ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असतो. मुळा, प्रवरा या दोन्ही नद्यांची वाळू चांगल्या प्रतीची मानली जाते. या वाळूला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परिणामी या वाळूला चांगला भाव मिळतो आहे. त्यामुळे या वाळू तस्करांची या धंद्यातून मोठी कमाई होत आहे. यातूनच तालुक्यातील तसेच नाशिक, पुणे, ठाणे जिल्ह्याबरोबर गुजरातमधील वाळू तस्करांची संख्या अकोले तालुक्यात वाढू लागली आहे.

नदीकाठच्या शेतकऱ्यांनी वाळू उपसा करण्यास विरोध केल्यास त्यांना दमदाटी केली जाते. त्यामुळे शेतकरी व वाळु तस्कर यांच्यात वादावादीचे प्रकार घडत आहेत. तसेच वाळू वाहतुकीच्या वाहनांमुळे शेतातील शेतकऱ्यांच्या पाईप्स फुटणे, पंपाला जोडलेल्या इलेक्ट्रिक केबल तुटणे हे नित्याचेच झाले आहे. वाळू तस्कर खुलेआमपणे रात्री अपरात्री वाळू उपसा करीत आहेत. परंतु प्रशासनांकडून त्यांच्यावर कोणतीच कडक कारवाई होत नाही. काही वाळू तस्करांना राजकीय वरदहस्त असल्याने जाणीवपूर्वक या वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे टाळले जात असल्याची चर्चा सुरू आहे.

Back to top button